चंद्रपूर:- चंद्रपुरात वाघाचा अर्धा जळालेला मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. मृत वाघाच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत असल्याने शिकार होण्याची शक्यता दिसत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार वाघाचा अर्धा जळालेला मृतदेह सापडल्याने वनविभाग हादरला. मृत वाघाच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत असल्याने शिकार होण्याची शक्यता दिसत नाही. असे वनविभागाचे मत आहे. वनविभागाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहर्ली वन परिक्षेत्रातील सीतारामपेठ वनपरिक्षेत्रांतर्गत भामडेली गावाजवळील इरई धरण संकुलात सोमवारी गस्त घालत असताना एका प्रौढ वाघाचा अर्धा जळालेला मृतदेह आढळून आला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती तात्काळ देण्यात आली.
तसेच वाघासोबत ही घटना १५ ते २० दिवसांपूर्वी घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत वाघाची नखे, दात आणि हाडे सर्व शाबूत आहे. त्याचे अर्धे शरीर जळाले आहे. अशी माहिती सामोर आली आहे. वाघाच्या मृत्यूनंतर त्याला आग लावण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नमुने घेतले आहे. तपासानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.