सिरोंचा:- सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथील एका शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक विहिरीचा भाग कोसळून तीन मजूर जमिनीत गाडले गेले. यातील दोघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना मंगळवार (ता. ८) सकाळी ११ वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार धन्नाडा समाक्का या शेतकऱ्याच्या शेतात पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरीचे खोदकाम सुरू होते. खोदकाम सुमारे ५० फूट खोल झाले होते. मात्र काम सुरू असतानाच विहिरीच्या खालच्या भागातील माती ढासळली आणि १० फूट उंचीची माती व वाळू मजुरांवर कोसळली.
यात मजूर उप्पाला रवी व कोंडा समय्या दोघे रा. जानमपल्, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली यांचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला. तिसरा मजूर संतोष कोनम हा सुखरूप असल्याचे कळते. मृत दोघेही स्थानिक रहिवासी असून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर व मजुरीवर अवलंबून होते.
त्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी तत्काळ एकत्र येऊन बचावकार्य सुरू केले. फावडे, बादल्या, दोरखंड आणि जेसीबी मशिनच्या साहाय्याने माती हटविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस विभाग आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्याचे नेतृत्व केले. मात्र, वेळ निघून गेल्यामुळे आणि मातीचा भार प्रचंड असल्याने दोघांनाही वाचविण्यात अपयश आले. पुढील तपास सिरोंचा पोलिस करत असून मृत्यू झालेल्या दोन्ही मजुरांचे मृतदेह उत्तरीय तपासणी करून कुटुंबीयांना सोपविण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.