कोरपना:- तालुक्यातील गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागील भागात आज गुरुवारी ( दि. 10 ) ला दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली. दोन युवकांपैकी एकाचा मृतदेह आढळून आला असून दुसरा युवक गंभीर अवस्थेत बेशुद्ध स्थितीत सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रज्वल नवले (वय २१) रा. वॉर्ड क्र. ३ गडचांदूर असे मृत युवकाचे नाव असून नागेश लांडगे (वय २०) रा. वॉर्ड क्र. ६ गडचांदूर हा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला तत्काळ उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा रहस्यमय मृत्यू आत्महत्या की घातपात हे समोर आले नसले तरी पोलीस त्या दिशेने पाऊल टाकत आहेत.
घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. प्राथमिक चौकशीनंतर मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
बेशुद्ध युवक शुद्धीवर आल्यानंतर व शवविच्छेदन अहवालानंतरच घटनेचे वास्तव स्पष्ट होईल. सध्या या घटनेला आत्महत्या की घातपात? असा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.