पोंभूर्णा:- तालुक्यातील भटारी येथील नागरिक दि. २० मे मंंगळवारला गडचिरोली जिल्ह्यातील बंदुकपल्लीला मालवाहू वाहनाने देवकारणासाठी जात असताना रेंगेवाही पुलाजवळील वळणावर वाहनाचा अपघात झाला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.त्या तिघांनाही बुधवारी भटारी येथे आणण्यात आले व त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने मृतकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.गावातील तिघांच्या अश्या दुर्देवी मृत्यूने भटारी गावात शोककळा पसरली आहे.
मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन:
अपघातात दुर्दैवी मृत्यू पावलेल्या ईश्वर जगन्नाथ कुसराम, रंजीता सुधाकर तोडासे व सुलका किर्तीराम आलाम यांच्या कुटुंबीयांची माजी पंचायत समिती सभापती अलका आत्राम, माजी जि.प.सदस्य राहुल संतोषवार, माजी सरपंच बंडू बुरांडे यांनी दि. २२ मे गुरुवारला भटारी येथे भेट घेऊन मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व आर्थिक मदत केली.
आर्थिक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न:
यावेळी मृतकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करुन देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे भ्रमणध्वनीवरून मागणी करण्यात आली. यावर आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मृतकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ आर्थिक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
असा घडला अपघात:
पोंभूर्णा तालुक्यातील भटारी येथील नागरिक गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील बंदूकपल्ली येथे दि.२० मे मंंगळवारला देवकारण कार्यक्रमासाठी जात होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या पीक अप वाहनाचे रेंगेवाही पुलाजवळील वळणावर नियंत्रण सुटल्याने वाहनाची झाडाला जबर धडक बसली.
3 जणांचा मृत्यू:
त्या गाडीत दबून ईश्वर कुसराम याचा जागीच मृत्यू झाला. तर रंजीता तोडासे हिचा चंद्रपूरला उपचारासाठी नेतांना मृत्यू झाला. तर सुलका आलाम हिचा चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
भटारीत तिघांवर अंत्यसंस्कार:
अपघातात दुर्दैवी मृत्यू पावलेल्या ईश्वर जगन्नाथ कुसराम व रंजीता सुधाकर तोडासे, सुलका किर्तीराम आलाम यांच्या पार्थिव दि.२१ मे बुधवारला भटारी येथे आणण्यात आले व तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
यावेळी वनिता कुसराम, सुधाकर तोडासे, किर्तीराम आलाम, माजी पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, माजी सरपंच बंडू बुरांडे, माजी सरपंच रमेश वेलादी, राजू ठाकरे, विजय वासेकर, शंकर आलाम, यांची उपस्थित होती.