Accident News: गडचांदूर अपघात: पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा बळी

Bhairav Diwase

कोरपना:- आज दिनांक ६ जून २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता गडचांदूर शहरात थुट्रा रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे गडचांदूर शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, AP07TE 9109 या क्रमांकाच्या ट्रकने MH34GB2740 या क्रमांकाच्या पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ट्रक पिकअपला फरफटत घेऊन गेला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका इलेक्ट्रिक पोलला आदळला. या धडकेत इलेक्ट्रिक पोल पूर्णपणे जमिनीवर उन्मळून पडला.

या दुर्दैवी अपघातात गडचांदूर शहरातील रहिवासी लता लक्ष्मण मुन यांचा जागीच मृत्यू झाला. लता मुन या दररोज सकाळी थुट्रा रोडने फिरायला जात होत्या आणि अपघाताच्या वेळी त्या पिकअपमध्ये दबल्या गेल्या. या घटनेमुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण गडचांदूर शहरात सकाळी फिरायला जाण्यासाठी कोणतीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही आणि नागरिक रस्त्याच्या कडेनेच चालण्यास भाग पडतात.

या अपघातामागे माणिकगड सिमेंट कंपनीच्या ट्रान्सपोर्टचे ट्रक रस्त्याच्या कडेला जागोजागी उभे असणे हे एक प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघातांना निमंत्रण मिळते. याबाबत कंपनी प्रशासन आणि वाहतूक विभाग लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अनेकदा निवेदने देऊन आणि मोर्चे काढूनही तात्पुरती कारवाई होते आणि नंतर परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिले की ट्रक जिवंत विद्युत तारांना स्पर्श करत होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी तात्काळ विद्युत विभागाशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्यास सांगितले. ठाणेदार कदम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि मृत महिलेचे शव विच्छेदनासाठी पाठवले.

पुढील तपास ठाणेदार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या अपघातामुळे गडचांदूर शहरातील वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

आधार न्युज नेटवर्क/ सतिश बिडकर, कोरपना