राजुरा:- राजुरा शहरातील रमाबाई वॉर्ड येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय कविता लक्ष्मण रायपुरे यांच्या खून प्रकरणी राजुरा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला (विधीसंघर्षग्रस्त बालक) ताब्यात घेतले आहे. घटनेच्या अवघ्या ६ दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून, वापरण्यात आलेला कोयताही जप्त करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
कविता रायपुरे आपल्या घरात एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून त्यांचा खून केला होता. घरातून बाहेरून कुलूप लावलेले असल्याने हा प्रकार उशिरा निदर्शनास आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. राजुरा पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. २९३/२०२५ कलम १०३(१), ३३२ (ब) भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलिसांची धावपळ आणि तपास?
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा राजुरा यांना आदेश दिले. पोलिसांनी दिवस-रात्र एक करून तपास सुरू केला. परिसरातील १५ ते २० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच, संशयाच्या आधारावर ४० संशयित व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, सुरुवातीला आरोपीचा कोणताही सुगावा लागत नव्हता.
गुप्त माहिती आणि तांत्रिक पुराव्यामुळे यश?
गुन्हेगारांना पकडणे अत्यंत क्लिष्ट असतानाही, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी तपास पुढे नेला. अखेर, या गुन्ह्यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला कोयता (हत्यार) देखील हस्तगत करण्यात आला.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक?
या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शन लाभले. ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुमीत परतेकी, पो.स्टे. राजुरा यांनी स्वतः या गुन्ह्याचा तपास केला. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली सपोनि निशा भुते, सपोनि हेमंत पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउपनि पांडुरंग हाके, पोउपनि भिष्मराज सोरते, पोउपनि चाटे, सफौ. किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पो.अं. महेश बोलगोडवार, पो.अं. शफीक शेख, पो.अं. शरद राठोड, पो.अं. अविनाश बांबोळे, पो.अं. आनंद मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईमुळे राजुरा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.