Chakkajam movement: प्रहार संघटनेचे चंद्रपूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन

Bhairav Diwase
शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळांच्या मागण्यांसाठी आक्रमक


चंद्रपूर:- प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली 25 जुलै 2025 चंद्रपूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळांच्या विविध प्रश्नांवरून, विशेषतः सातबारा कोरा करण्याच्या आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले.



शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी यापूर्वी सात दिवसांचे आमरण उपोषण आणि अमरावती ते यवतमाळ जिल्ह्यापर्यंत पायदळ यात्रा केली होती. मात्र, सरकारने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने प्रहार संघटना आता आक्रमक झाली आहे.


चंद्रपुरात चक्काजाम:

चंद्रपूर जिल्ह्यात, प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासूनच चंद्रपूर-आदिलाबाद- तेलंगणा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत रस्ता रोखून धरला. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अखेर, पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांशी चर्चा केली आणि रस्ता मोकळा करण्यात आला, त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.


आंदोलनात सहभागी प्रमुख व्यक्ती:

कोरपना तालुका प्रमुख विनोद शिंदे, महादेव बेरड, अभिमन्यू चव्हाण समर्थक, प्रफुल देवलकर, इसाक बेग, गजानन पेंदोर, शैलेश विरूतकर, अनुप राखुंडे, निलेश मुरमुरबार, रोशन हरबडे, काँग्रेसचे रोशन आस्वले, शेतकरी रवी आशिष मुसळे, बोधले, मनीष लोंढे, किशोर कोहळे, विलास देवाळकर, दिलीप पाहणपटे, राम काकडे, उरकुडे धर्म पाटील, आणि इतर काँग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना व सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते.


प्रमुख मागण्या:

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांवर प्रहार संघटना आक्रमक झाली असून, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची प्रमुख मागणी आहे. बच्चू कडू यांनी विदर्भात पदयात्राही काढली होती आणि आता सरकारला जागं करण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आहे. आज राज्यभर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्काजाम आंदोलन सुरू आहे. प्रहार संघटनेने सरकारला लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.