CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सुधीर भाऊंकडे खास जबाबदारी देण्याची दाट शक्यता?

Bhairav Diwase

मुंबई:- विधानसभा निवडणुकीत दणदणीत कामगिरी करत बहुमताच्या जवळपास पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल दिसू शकतात.  विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नवा चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते.


उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते गिरीश महाजन यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यासाठी त्यांना मंत्रि‍पदाच्या जबाबदारीतून मुक्त केलं जाऊ शकतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यात २०२२ मध्ये सत्तांतर झालं. तेव्हापासून नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद आहे. त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची इच्छा आहे. ती लवकरच पक्षाकडून पूर्ण केली जाऊ शकते.


भाजपचे निष्ठांवत, वरिष्ठ नेते आणि मंत्रि‍पदाचा दांडगा अनुभव असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना भाजपनं मंत्रि‍पदापासून दूर ठेवलं. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होता. पण फडणवीस पुन्हा आले आणि मुनगंटीवार मंत्रिमंडळातून बाहेर गेले. त्यानंतर विधिमंडळाच्या गेल्या दोन अधिवेशनांमध्ये मुनगंटीवार सातत्यानं सत्ताधाऱ्यांची कोंडी करत आहे. एखाद्या विरोधी पक्ष नेत्याला साजेशी कामगिरी त्यांच्याकडून सुरु आहे. त्यामुळे अनेकदा सरकारची गोची झाली आहे. मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलेलं आहे.


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वादग्रस्त मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अकार्यक्षम आणि वादग्रस्त नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. सेनेचे मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले, योगेश कदम यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ यांच्यावरही मंत्रिपद गमावण्याची नामुष्की येऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांआधी मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे बदल करु शकतात.