Chandrapur police: पोलीस अत्याचाराची गंभीर घटना; अन्यायग्रस्त आईचा आक्रोश

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूरमध्ये पोलिसांच्या अमानुष अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्र नगर, आंबेडकर कॉलेजच्या मागे राहणाऱ्या अनिता रवींद्र गेडाम यांनी एका पत्रकार परिषदेत आपल्या मुलावर म्हणजेचं आनंद गेडामवर झालेल्या अमानवी मारहाणीची माहिती देताना हृदयद्रावक कथन केले. या घटनेने चंद्रपुरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


काय घडले "त्या" रात्री?

अनिता गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४ जुलै रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिकारी देवराव नरोटे आणि त्यांच्या टीमसह चार महिला पोलिसांनी कोणतीही नोटीस किंवा वॉरंट नसताना, अनिता गेडाम यांच्या घराचे गेट फोडून, दगडफेक करत आणि दरवाजा तोडून बेकायदेशीररित्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी घरातील लोकांना शिवीगाळ केली, धमकावले आणि "आनंद गेडामचा फोटो घ्यायचा आहे" असे म्हणत अरेरावी केली. या भीतीने अनिताताईंचा मुलगा आनंद गेडाम घरातून पळून गेला. मात्र, काही वेळातच नरोटे व त्यांच्या टीमने आनंदला पकडले आणि रागंबर व ठाकूर यांच्या घराच्या मध्ये नेत अमानुष मारहाण केली. मारहाणीनंतर त्याला अर्धमेला अवस्थेत गल्लीत फेकून देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी ॲम्ब्युलन्स बोलावून त्याला ताब्यात घेतले आणि कोणतीही माहिती न देता पळ काढला, असा आरोप अनिता गेडाम यांनी केला आहे.


आनंदची प्रकृती चिंताजनक?

सकाळी फोन आल्यानंतर कुटुंबीयांनी सरकारी दवाखान्यात जाऊन पाहिले असता आनंद गेडाम याची स्थिती अत्यंत गंभीर होती. सिटीस्कॅन व इतर चाचण्यांनंतर डॉक्टरांनी त्याला तात्काळ नागपूर मेडिकलला रेफर केले. सध्या त्याला पोद्दार खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे, आणि त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.


अनिताताईंच्या प्रमुख मागण्या?

या गंभीर घटनेनंतर अनिता गेडाम यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:

१. पोलीस नरोटे व त्यांच्या टीमवर तत्काळ निलंबन व गुन्हा दाखल करावा.

२. संपूर्ण घटनेची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

३. या घटनेतील दोषींवर मानवाधिकार उल्लंघनाचा गुन्हा नोंदवावा.

अनिता गेडाम यांनी आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) यांच्याकडेही तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.

लोकशाही आणि पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?

या घटनेमुळे कायदा-संविधानाचा उघड उघड अपमान झाल्याचे अनिता गेडाम यांनी म्हटले आहे. "सामान्य नागरिकांच्या घरात पोलीस बेकायदेशीररित्या घुसून मारहाण करत असतील तर हाच का 'लोकशाहीचा रक्षक' असलेला पोलीस यंत्रणा?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.


पत्रकार परीषदेत भावनिक आवाहन: 

आजच्या पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आवाज उठवला आहे, 'माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे!' असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

"ते" सर्व आरोप बिनबुडाचे - पोलीस प्रशासन

गुड्डू उर्फ आनंद रविंद्र गेडाम (वय २३) याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये हत्या, जबरी चोरी, मारामारी आणि चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कारवायांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता अधिनियम (MPDA) अन्वये त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी आनंद गेडामच्या घरी पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीच आनंद रविंद्र गेडामने स्वतःच्या घराचे कवेलू काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो आजूबाजूच्या इमारतींवर चढून पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान, पोलिसांच्या भीतीने तोल गेल्याने तो खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठीच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिथे गेले होते. आरोपी पळून जात असताना तोल जाऊन पडला, यात कोणत्याही पोलिसांची चूक नाही. पोलिसांवर केले जात असलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार व बिनबुडाचे आहेत. असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.