चंद्रपूर:- चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत एका गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक गस्तीवर असताना त्यांना एका गोपनीय बातमीदाराकडून शास्त्रीनगर परिसरात एका संशयिताच्या घरात अवैध शस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी पंचांसमक्ष सोनुलाल उर्फ नन्नु कैथल (वय २८ वर्षे, रा. शास्त्रीनगर, वॉर्ड क्र. ५, घुग्घुस) याच्या घरावर छापा टाकला.
छाप्यात सोनुलाल उर्फ नन्नु कैथल याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचा देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा एकूण २५,५००/- रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि चौकशी केली.
चौकशीदरम्यान सोनुलालने सांगितले की, त्याने हे अग्निशस्त्र आणि काडतूस त्याचा मित्र मासिन निसार शेख (वय २८ वर्षे, रा. गांधीनगर वॉर्ड, घुग्घुस) याच्याकडून विकत घेतले होते.
पोलिसांनी तात्काळ मासिन निसार शेख यालाही ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा क्रमांक १३७/२०२५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घुग्घुस पोलीस करत आहेत.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडली. या पथकात पोउपनि श्री. विनोद भुरले, श्री. सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे, इमरान खान, पोअ किशोर वाकाटे आणि हिरालाल गुप्ता यांचा समावेश होता.