गोंडपिपरी:- राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांबद्दल अपमानजनक भाष्य करीत आहेत.शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कोकाटेंनी आता विधिमंडळात जंगली रमी जुगार खेळण्याचा निंदनीय प्रकार केला आहे.अशा असंवेदनशील मंत्री महोदयांना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे.त्यांच्यावर शेतकरी अपमान प्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी गोंडपिपरी येथील काँग्रेस,उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे. तालुक्यातील छत्रपती शिवाजी चौक येथे दि.(२४) गुरुवारी भर पावसात पत्ते उधळत कृषी मंत्राचा निषेध करण्यात आला.
राज्यात शेतकरी बांधवांची स्थिती अतिशय बिकट आहे. शेतकरी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सरकार कर्जमाफी करण्यास तयार नाही,काही ठिकाणी पाऊस न झाल्याने रोवणी लांबणीवर गेली आहे.दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली तर काही भागात अति पावसामुळे शेतकऱ्यांची पीके नष्ट झालेत.आधीच राज्यातील शेतकरी बांधवांची वाईट अवस्था असताना सरकारचे प्रतिनिधी त्यांच्या जखमेवर मीठ चोडण्याचे काम करीत आहे.
शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे आशेने बघावं असे कृषिमंत्री कोकाटे असंवेदनशीलतेचा कळस गाठत आहेत .गेल्या काही दिवसात त्यांनी शेतकरी बांधवांसंदर्भात अतिशय अपमानजनक भाष्य करीत भिकारी शब्द संबोधला आता हेच मंत्री विधिमंडळात रमी ऑनलाइन जुगार खेळत आहेत हा प्रकार संतापजजनक आहे.कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा तातडीने घेण्यात यावा या मागणीला घेउन गोंडपिपरीत भर पावसात निदर्शने करण्यात आले.या संदर्भात शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठवले.
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष देविदास सातपुते,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार,काँग्रेस शहर अध्यक्ष राजू झाडे,माजी तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते, नगरसेवक यादव बांबोडे, तालुका अध्यक्ष अनु.जाती सेल गौतम झाडे,काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष विपीन पेदुलवार, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे, बाजारसमिती संचालक अशोक रेचंनकर,युवासेना शहर प्रमुख विवेक राणा,आक्सापुर शिवसेना शाखा प्रमुख दर्शन वासेकर,चेक नांदगाव शाखा प्रमुख अमोल कुकुडकर,माजी सरपंच साईनाथ कोडापे, शहर उपाध्यक्ष प्रशांत कोसनकर,बालाजी चनकापुरे,मुन्ना शेख,गोकुळ सोनटक्के,राहुल मेकरतीवार, नबात सोंनटक्के,मधुकर भोयर,नितीन धंदरे, गौरव कोहपरे यांचे सह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.