कोरपना:- कोरपना-वणी राज्य महामार्गावरील तांबाडी फाट्याजवळील एका धाब्यावर स्वतःला उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी म्हणवून खंडणीची मागणी करणाऱ्या आणि एका स्कार्पिओ गाडीतून १६ हजार रुपये चोरणाऱ्या दोन व्यक्तींवर कोरपना पोलिसांनी बुधवारी (ता. २३) गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
भालचंद्र शेरकुरे हे बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास धाब्यालगतच्या शेतात आले होते. पिकासाठी खत खरेदी करण्यासाठी त्यांनी १६ हजार रुपये रोख आणले होते. शेतात काम करण्यापूर्वी त्यांनी ही रक्कम स्कार्पिओ गाडीच्या डिकीत ठेवली होती.
कामानंतर परत आल्यावर डिकीत पैसे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. धाब्यावरील श्रीकांत मेश्राम यांना विचारणा केली असता, नीतेश उराडे आणि चंदू बनसोड या दोन व्यक्तींनी स्वतःला उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी सांगून धाबा आणि गाडीची झडती घेतल्याचे समजले. ज्यामुळे त्यांनीच १६ हजार रुपये चोरल्याचे स्पष्ट झाले. यानंतर शेरकुरे यांनी कोरपना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तसेच या दोघांनी तांबाडी फाट्याजवळील धाब्यावर उत्पादक शुल्क अधिकारी आणि लोकसेवक असल्याचे भासवून झडती घेतली. यावेळी त्यांनी तीन पेट्या दारू जप्त केली आणि १५ हजार रुपयांची खंडणी मागून धमकी दिली. धाबा मालकाने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. या दोन तक्रारींच्या आधारे, पोलिसांनी गुन्हा नोंदवला.