कोरपना:- कोरपना तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजणे यांनी ७ जुलै २०२५ रोजी गटविकास अधिकारी कोरपना यांना निवेदन सादर केले होते.
त्या अनुषंगाने पंचायत समिती सभागृह कोरपना येथे कोरपना तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आलेले होते, यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २,मोदी आवास योजना,रमाई आवास योजना,शबरी आवास योजना यावर योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्या संदर्भात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून त्या समस्या सोडविण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ मध्ये तालुक्यात एकूण २२४० घरकुल मंजूर झालेले आहे. त्यापैकी १७७८ लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झालेला आहे. परंतु ४६१ लाभार्थ्यांच्या खात्यात ईकेवायसी अभावी अनुदान जमा झालेले नव्हते.अनेक लाभार्थ्यांचे डीबीटी बँक खाते नसल्यामुळे त्यांना पंचायत समितीमध्ये पोस्टाचे बँक खाते काढून देण्यात आले. त्यामुळे सदर लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी प्रामुख्याने गटविकास अधिकारी विजय पेंदाम, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, विस्तार अधिकारी भीमाशंकर काळे, नोडल अधिकारी सुजित बेलेकर, मयूर कोटरंगे, मयूर धामणकर, सुनील ढगे, महेश शेळके, शिवानी मस्कावार व तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.