Click Here...👇👇👇

Police News : पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं पडलं महागात

Bhairav Diwase
गडचिरोली:- सावधान! तुमचा मुलगा वा मुलगी अल्पवयीन असेल तर त्याच्या हातात मोटारसायकल देऊ नका. नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. गडचिरोली पोलिसांनी अशीच एक मोहीम राबवून मोटारसायकल चालविणाऱ्या २४ अल्पवयीन मुला-मुलींच्या पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

🌄
गडचिरोली शहरात मागील काही दिवसांपासून वाहतूक वाढल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक अल्पवयीन मुले व मुलीसुद्धा विनापरवाना मोटारसायकल चालवत असतात. यामुळे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने होऊन बेजबाबदारपणे वाहन चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याअनुषंगाने पोलिसांनी दोन दिवस नाकेबंदी केली. या मोहिमेदरम्यान अल्पवयीन मुले विनापरवाना वाहन चालवताना आढळून आले. पालकांनी त्यांच्या अल्पवयीन पाल्यांकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना त्यांना मोटारसायकल चालविण्याची मुभा दिली. त्यामुळे २९ जून रोजी मोटारसायकल चालवणाऱ्या १४ आणि ३ जुलैला १० अशा एकूण २४ मुलामुलींच्या पालकांवर मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ कलम १९९(ए) अन्वये गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. सर्व मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
🌄

विशेष म्हणजे,अल्पवयीन मुलामुलींकडून मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा घडल्यास अशा वाहन मालकास ३ वर्षांपर्यंतचा कारावास किंवा २५ हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होण्याची तरतूद आहे. तसेच अशा अल्पवयीन मुलांवर बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार बाल न्याय मंडळासमोर खटलासुद्धा चालवला जाऊ शकतो. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे. गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.