चंद्रपूर:- शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या वक्तव्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. "मंत्रीमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याची कुठलीही चर्चा कोअर ग्रुपमध्ये झालेली नाही," असे स्पष्ट करत मुनगंटीवार यांनी सध्यातरी अशा कोणत्याही बदलाची शक्यता नाकारली आहे.
चंद्रपूर येथे पत्रकारांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्या विधानावर उत्तर देताना सांगितले की, "राज्यातील मंत्रीमंडळाचा कोणताही निर्णय हा राज्यस्तरावर घेतला जात नाही, तो निर्णय दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार घेतला जातो. त्यामुळे असे कोणतेही बदल होत असतील तर त्याबाबत वेळेवर माहिती दिली जाते."
ते पुढे म्हणाले, "माझ्या वैयक्तिक मतानुसार सध्या अशा प्रकारचा कोणताही मंत्रीमंडळ फेरबदल होईल असे वाटत नाही. निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे सध्या स्थिरतेची गरज आहे." विधानसभा अध्यक्ष पदाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, "या संदर्भात मला सध्या कोणतीही माहिती नाही. मात्र, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता, सध्या मंत्रीपदावर बसलेले नेते किंवा लोकप्रतिनिधी यांना अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार नाहीत असे मला वाटते."