चंद्रपूर:- चंद्रपूरमध्ये एका चौकाला नाव देण्यावरुन जोरदार वाद रंगला असून याच मुद्द्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळाले. भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी एका चौकाला आपल्या आईचे नाव देण्याची योजना केली आहे, मात्र याला काँग्रेसचा जोरदार विरोध पाहायला मिळत आहे.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी एका चौकाला आपल्या आईचे नाव देण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे काँग्रेसने आज निषेध आंदोलन केले. आमदार जोरगेवार यांच्या आई अम्मा नावाने ओळखल्या जायच्या. मुलगा आमदार झाल्यावरही त्यांनी आपला बांबूच्या टोपल्या विकण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरूच ठेवला. गांधी चौकालगत असलेल्या सात मजली इमारतीबाहेर त्या बसायच्या. यामुळे या जागेला अम्मा चौक नाव द्यावे, यासाठी आमदार जोरगेवार यांनी महापालिकेत ठराव मंजूर करवून घेतला.
कॉंगेस कार्यकर्ते कार्यस्थळी जात निषेधाच्या घोषणा:
त्यानुसार आता या जागी नामफलक लावण्यासाठी ओटा तयार झाला आहे. ही माहिती मिळताच काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी कार्यकर्त्यांसह कार्यस्थळी जात निषेधाच्या घोषणा दिल्या आणि पालिका आयुक्तांना निवेदन दिले. एखाद्या आमदाराची आई विशिष्ट ठिकाणी बसली म्हणून त्या जागेला त्यांचे नाव देणे, हे कितपत संयुक्तिक आहे, असा सवाल काँग्रेसने केला. हाच निकष लावायचा झाल्यास प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रसिद्ध आहे. मग त्या जागीही असे नाव देणार का, असा प्रश्न करण्यात येत आहे.
आमदाराच्या आईचे कर्तृत्व काय, समाजासाठी त्यांचे योगदान काय?
दरम्यान, मुळात आमदाराच्या आईचे कर्तृत्व काय, समाजासाठी त्यांचे योगदान काय, याचाही विचार झाला पाहिजे. केवळ आमदाराची आई आहे म्हणून त्यांचे नाव दिले जात असेल, तर शहरात अनेक ठिकाणी चौक निर्माण करावे लागतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली.