Chandrapur News : आमदार आणि महाविद्यालय व्यवस्थापनाचा विरोध; चंद्रपूरमध्ये आंबेडकरी जनतेचा निषेध आंदोलन

Bhairav Diwase

चंद्रपूर:- शहरात सध्या एक वाद सुरू आहे. हा वाद विद्यमान आमदार आणि आंबेडकरी अनुयायी यांच्यात सुरू आहे. आमदारांनी त्यांच्या आईचा पुतळा दीक्षाभूमी परिसराच्या जवळ बसवण्याचं काम सुरू केलं होतं. या जागेवरून ते बांधकाम हटवण्यात यावं अशी मागणी आंबेडकरी जनतेची आहे.

याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने आमदारांना "अम्मा की पढाई" नावाचा उपक्रम राबवण्यासाठी आणि बॅनर लावण्यासाठी परवानगी दिली होती. यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या उपक्रमाला स्थगिती देऊन बॅनर काढून टाकण्याची आणि भविष्यात अशा उपक्रमांना परवानगी न देण्याची विनंती केली जात आहे.


या दोन्ही घटनांमुळे आंबेडकरी समाजामध्ये रोष निर्माण झाला असून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी भिमज्योती बुद्ध विहार, वैशाली बुद्ध विहार, करुणा बुद्ध विहार, प्रबुद्ध बुद्ध विहार, लुंबिनी बुद्ध विहार आणि शहरातील आंबेडकरी जनता एकत्र आल्या आहेत.


या ऐतिहासिक दीक्षाभूमीचं महत्त्व कमी करण्याचा किंवा त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत असल्याचं आंबेडकरी जनतेचं म्हणणं आहे. त्यामुळे या घटनांना वेळीच आळा घालून थांबवण्याची मागणी केली जात आहे.


भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी लक्ष घालून आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती प्रशासनाकडे केली जात आहे.