Chandrapur News : दोन स्विमिंग प्रशिक्षकांमधील वादामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूरमधून एक घटना समोर येत आहे. जिथे दोन स्विमिंग प्रशिक्षकांमधील वादामुळे एका होतकरू विद्यार्थ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संतप्त पालकांनी संबंधित प्रशिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.
चंद्रपूर शहर जिल्हा स्टेडियममधील जलतरण तलावात प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या श्रीकांत बल्की यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यांच्या गैरवर्तनामुळे एका शालेय विद्यार्थ्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आणि त्याचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणावरून पालक आणि दुसऱ्या प्रशिक्षकाने बल्की यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
हा प्रकार रविवार, २४ ऑगस्ट रोजी घडला. शहरातील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थ्याची जलतरण स्पर्धा होती. शाळेने या विद्यार्थ्याची ऑनलाइन नोंदणीही केली होती. परंतु, जेव्हा हा विद्यार्थी स्पर्धेसाठी स्विमिंग पूलमध्ये पोहोचला, तेव्हा प्रशिक्षक श्रीकांत बल्की यांनी स्पर्धा पोर्टलवर त्याचे नाव नोंदणीकृत नसल्याचे सांगत त्याला स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखले. यामुळे तो विद्यार्थी खूप निराश झाला.


यावेळी विद्यार्थ्याचे शिक्षक आणि दुसरे प्रशिक्षक राकेश कुमार रॉय यांनी श्रीकांत बल्की यांच्याकडे विचारणा केली असता, बल्की यांनी दोघांनाही शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप राकेश कुमार रॉय यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्याचे मोठे नुकसान झाले असून, पालकही संतप्त झाले आहेत.


पत्रकार परीषदेत राकेश कुमार रॉय म्हणाले की, “मी त्यांना विचारले की असे का झाले, तर त्यांनी माझ्यावर आणि शिक्षकांवर शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या चुकीमुळे विद्यार्थ्याचे नुकसान झाले, जे चुकीचे आहे.”


अनिल झाडे यांनी म्हणाले की, “प्रशिक्षक बल्की यांच्या अशा वागणुकीमुळे मुलांचे मनोधैर्य खचते. आज आमच्या मुलासोबत झाले, उद्या दुसऱ्यासोबत होईल. आम्ही त्यांच्यावर त्वरित कारवाईची मागणी करतो जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.”


या पत्रकार परिषदेत राकेश कुमार रॉय यांच्यासह पालक अनिल झाडे, मंजुषा झाडे, सुनीता टोंगे आणि पल्लवी वानखेडे हे उपस्थित होते. त्यांनी जिल्हा स्टेडियम प्रशासनाला या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन श्रीकांत बल्की यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दोषीवर कडक कारवाई करु:- पुंड

या बाबत विचारणा केली असताना झालेल्या प्रकाराची चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करणार असे जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांनी म्हटले आहे