भंडारा:- एसटी बसमध्ये अनेकदा खचाखच गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना एकमेकांचा धक्का लागतोच. अशाच प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमधील प्रवाशांना पुढे सरकवण्याचा प्रयत्नात चुकून वाहकाचा स्पर्श एक तरुणीला झाला. मात्र, सदर तरुणीने एसटी बस वाहकाने तिचा विनयभंग केल्याचा आरोप करीत कांगावा करण्यास सुरुवात केली. अखेर सर्व प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात नेली.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. साकोलीकडून बोडदे गावाला जाणारी रात्रीची शेवटची एसटी बस असल्याने शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांनी बस खचाखचं भरली होती. त्यानंतरही काही प्रवाशी बसखाली असल्याने बसमधील प्रवाशांना पुढे सरकवण्याचा प्रयत्नात चुकून वाहकाचा स्पर्श एक तरुणीला झाला. मात्र, सदर तरुणीनं एसटी बस वाहकानं तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला. वाहकाने तिला चुकून धक्का लागल्याचे सांगितले मात्र ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर सर्व प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली. यावेळी तरुणीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांकडे तक्रार केली.
या तक्रारीवरून बसमधील सर्व प्रवाशांची चौकशी केली असता, असा प्रकार झाला नसल्याचं समोर आलं. त्यानंतर तब्बल तासाभरानंतर तरुणीची खोटी तक्रार असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी तरुणीला समज देत एसटी पुढील प्रवासाला निघाली. यात मात्र, बस मधील प्रवाशांना तासभर नाहक मनःस्ताप सहन करावा लागला. हा संपूर्ण प्रकार ८ सप्टेंबर रोजी रात्री भंडाऱ्याच्या साकोली एसटी आगारात घडला.