Video Viral: शिक्षकांच्या बदलीने झेडपी शाळेत विद्यार्थी ढसाढसा रडले

Bhairav Diwase

परभणी:- कुटुंबापेक्षा विद्यार्थ्यांचा अधिक वेळ हा शाळेत जातो. त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी एक जिव्हाळ्याचे नाते तयार होते. सोमवारी परभणी तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील ६ शिक्षकांची बदली झाली. या शिक्षकांना मंगळवारी निरोप देताना विद्यार्थिनींच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले. शिक्षक, विद्यार्थ्यांचे नाते दाखविणारा भावनिक व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्रह्मपुरी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता १ ते ७ वीपर्यंत शाळा २७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत सन २०१८ पासून १० शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी सहा शिक्षकांची नियमाप्रमाणे आठ वर्षांनंतर बदली झाली. शिक्षक एस.एस. रेवनवार, आर.एम. केंद्रे, एन.जी. पेंटे, एम.एच. चेनलवाड यांच्यासह शिक्षिका ए.बी. मुंडे, एस.एस. पवार यांना सोमवारी शाळेत निरोप देण्यात आला. या शिक्षकांनी आठ वर्षांत पालकांना साक्षरतेचे महत्त्व पटवून देत शाळेतील मुलींची पटसंख्या वाढवली. या काळात शिक्षक, विद्यार्थ्यांचे भावनिक नाते निर्माण झाले होते. मात्र, आठ वर्षांनंतर सोमवारी बदली झाल्याने मंगळवारी निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले