Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात 'मतांची चोरी' झाल्याचा काँग्रेसचा आरोप

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाली. काँग्रेसच्या तक्रारीनंतर सहा हजार ८५३ बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपीपर्यंत पोलीस अद्याप पोहचले नाही. निवडणूक आयोग तथा जिल्हाधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्यापलीकडे अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. भाजपचे आमदार देवराव भोंगळे चाेरीच्या मतांवरच विजयी झाले. वरोरा विधानसभा तसेच जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रपरिषदेत केला.


काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सबळ पुराव्यानिशी मतांची चोरी उघड केली आहे. अशाच प्रकारची मतचोरी चंद्रपूर जिल्ह्यातही झाली आहे. राजुरा येथील प्रकरण तर मतचोरीचा सबळ पुरावा आहे. येथे असंख्य फोनवरून मतांची नोंदणी झाली होती. त्यानंतर सहा हजार ८५३ बोगस मतदारांची नावे वगळण्याची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी राजुरा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविण्यात आला, मात्र कारवाई शून्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईसंदर्भात विचारले तर निवडणूक आयोगाकडे बोट दाखवतात, असे सांगतानाच, केवळ राजुराच नाही तर वरोरा मतदारसंघ तसेच जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत मतचोरी झाल्याचा दावा जिल्हाध्यक्ष धोटे व खासदार धानोरकर यांनी केला.


निवडणूक काळात भाजप उमेदवार तथा विद्यमान आमदार भोंगळे यांचे प्रचार साहित्य आणि रोख ६१ लाख रुपये मिळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला, मात्र कारवाई शून्यच. आता तर 'एनसी मॅटर' म्हणून फाईल बंद केली. मात्र, ६१ लाख रुपये आले कुठून हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पोलीस विभागाकडे पैसे पडून आहे. पोलीस विभाग यावर काहीही बोलायल तयार नाही, असा आरोपही धोटे यांनी केला. यावेळी धोटे यांनी, लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद केल्याने गरजू लाडक्या बहिणी मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप केला. तसेच राज्याची आर्थिक घडी विस्क्टल्याने पीकविमा, शिवभोजन थाली तसेच अनेक लोकोपयोगी योजना बंद होत असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला शहर अध्यक्ष रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, विनोद दत्तात्रेय, सुनंदा धोबे, सुनिता लोढीया, नंदू नागरकर, प्रविण पडवेकर, राजेश अडूर, शिवा राव, उपस्थित होते.


'त्या' 61 लाख रूपयांबाबत कारवाई का नाही?

राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या तक्रारी नंतर 6,853 बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यासंदर्भात राजुरा तहसीलदार यांनी 19 ऑक्टोबर 2024 रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, अद्याप ही नावे मतदार यादीत जोडणार्‍यांविरूध्द कोणतीही कारवाई झाली नाही. ते प्रकरण थंड बस्त्यात टाकले आहे. तसेच दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी राजुरा विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवराव भोंगळे यांचे प्रचाराचे बॅनर, बिल्ले व इतर साहित्य तथा रोख रक्कम 61 लाख सापडले. भारतीय न्याय सहिता कलम 173, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950, 1951, 1989 कलम 123 (1) अन्वये गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याही प्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप सुभाष धोटे यांनी यावेळी केला.