Subhash Dhote: मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये

Bhairav Diwase
चंद्रपूर:- मराठा आंदोलकांनी मुंबई पार ठप्प करून ठेवली आहे. सरकारने एक तर त्यांना मुंबईत येऊच द्यायला नको होते. नाही तर तशी सुव्यवस्था करायला हवी होती. आज मुंबईकरांचे हाल होत आहे, त्याला कोण जबाबदार आहे असा प्रश्न करीत, आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाविरुध्द नाही, पण मराठ्यांना ओबीसींतून आरक्षण देता कामा नये, असे स्पष्ट मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी येथे पत्रपरिषदेत व्यक्त केले.


यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, काँगे्रसचे शहराध्यक्ष रामू तिवारी, प्रदेश सचिव विनोद दत्तात्रय, विनायक बांगडे, सुनिता लोढिया, नंदू नागरकर आदी यावेळी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तातडीने सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतपिकांचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यात यावी. मागील काळात 1 रुपयात पीक विमा देण्यात येत होता. मात्र, आताच्या स्थितीत हेक्टरी 1200 रुपये पीक विमा रक्कम भरायची असल्याने अनेक शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात सन 2024-25 या वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 3 लाख 51 हजार 526 शेतकर्‍यांनी पीक विमा काढला होता. तर आता सन 2025-26 च वर्षात फक्त 99 हजार 672 शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे, अशी माहितीही धोटे यांनी दिली.


सद्य स्थितीत लाडकी बहीण योजनेचे नोंदणी पोर्टल पूर्णता बंद ठेवण्यात आले आहे. एखादी लाडकी बहीण नविन अर्ज करण्यास इच्छूक असेल तर त्यांनी काय करावे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने शहरी व ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. 28 ऑगस्ट 2024 रोजी रस्ते अपघातामध्ये निष्पाप 8 लोकांचा बळी गेला. त्यानंतर लगेच 2 दिवसात राजुरा येथील युवकाचा अपघात झाला. जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रात्रीच्या वेळेस महामार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन करावा लागतो, असेही धोटे म्हणले.


जिल्हा वार्षिक योजना नियतव्यय 510 कोटीची मागणी आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त 30 टक्केच निधी जिल्ह्याच्या विकासासाठी दिला आहे. आदिवासी विकास विभागाचा नियतव्यय 115 कोटीचा आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील अमृत योजनेची कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याने शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोपही धोटे यांनी यावेळी केला.