चंद्रपूर:- चंद्रपूर आगाराची भादुर्ली ते मुल जाणारी बस क्रमांक MH40 N 9426 ही दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास रेल्वेपटरी खालील बोगद्यात अडकल्याची घटना घडली. बोगद्यात अंदाजे एक ते दोन फूट पाणी साचलेले असतानाही चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर आगाराची बस (क्रमांक MH40 N 9426) भादुर्ली येथून मुलच्या दिशेने येत होती. सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास गाडी रेल्वे बोगद्याजवळ पोहोचली. त्यावेळी बोगद्यात अंदाजे एक ते दोन फूट पाणी जमा झालेले होते. बस निघू शकेल असे समजून चालकाने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा साठा वाढल्याने बसच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेले आणि बस अचानक बंद पडली.
काही वेळातच पाऊस वाढल्याने बोगद्यातील पाण्याची पातळीही वाढली. यामुळे बसचे रेडिएटर पूर्णपणे पाण्यात बुडाले आणि बस जागेवरच अडकून पडली. सुदैवाने, बसमध्ये केवळ तीन प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी आणि चालक-वाहक सुखरूप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर आगाराचे आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी आणि सहाय्यक यंत्र अभियंता तातडीने यांत्रिक कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.