चंद्रपूर:- मुरली ॲग्रो सिमेंट ही कंपनी दालमिया सिमेंटने ताब्यात घेतल्यानंतर गावातील ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढला आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना विश्वासात न घेता कंपनीला परस्पर ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यामुळे सांगोडा गावातील शेतकरी आणि शासकीय गायरान जमिनी कंपनीच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार कोरपना आणि गट विकास अधिकारी यांच्या दालनात कंपनीसोबत चर्चा केली होती, परंतु कंपनीने ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. यामुळे, संतप्त झाल्याने विठोबा दिनकर बोंडे यांनी २३ सप्टेंबर २०२५ पासून तहसील कार्यालय, कोरपना समोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत खालील मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी प्रशासनाला कळवले आहे.
प्रमुख मागण्या:
१. ग्रामपंचायतीने मासिक सभेत दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे.
२. सांगोडा ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी सरपंच आणि सचिवांकडून वसूलपात्र रक्कम वसूल करावी.
३. पंचायत समिती विस्तार अधिकारी दादाराव पवार यांनी खोटे अहवाल तयार करून सरपंच आणि सचिवांना वाचवण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे.
४. सांगोडा येथील अंदाजे २० हेक्टर गायरान जमीन ग्रामपंचायतीने कंपनीला देण्याचा प्रयत्न थांबवावा.
५. कंपनीने खदानीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सरसकट ताब्यात घ्याव्यात आणि ज्यांची जमीन घेतली आहे, त्यांना कंपनीत नोकरी द्यावी.
६. उद्योग समूहाच्या नियमांनुसार, कंपनीच्या सभोवतालच्या गावांमध्ये, जसे की अंतरगाव, हिरापूर, कडोली, कारवाई आणि वनोजा येथील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी द्यावी.
७. ज्या ठिकाणी कंपनीने खदान सुरू केली आहे, तेथील अंदाजे वीस गावांच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे स्थलांतर करून ती पुन्हा सुरू करून द्यावी.
या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.