खासदार धानोरकर, माजी गृह राज्यमंत्री अहिर, आमदार जोरगेवार यांच्याकडून शोक व्यक्त!
सहकार व शिक्षण क्षेत्रातील महानायक हरपले:- खासदार प्रतिभा धानोरकरसहकार व शिक्षण क्षेत्रातील अवघे आयुष्य समाजासाठी अर्पण करणारे सहकार व शिक्षण महर्षी बाबासाहेब वासाडे यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने सहकार व शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून, हा संपूर्ण समाजासाठी अपूरणीय धक्का आहे, अशी भावना आपल्या शोकसंदेशातून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर पुढे म्हणाल्या की, बाबासाहेब वासाडे यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, मजूर, विद्यार्थी आणि सहकाराशी निगडित घटकांना आपल्या कार्यातून दिशा दिली. त्यांनी शिक्षण संस्था उभारून ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडवली. सहकार चळवळ मजबूत करत सामाजिक-आर्थिक विकासाचा मार्ग त्यांनी दाखवला. त्यांचे कार्य हे केवळ सहकारापुरते मर्यादित नव्हते. शिक्षण, समाजजागृती, सामाजिक ऐक्य या क्षेत्रांत त्यांनी केलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे असंख्य युवकांना प्रेरणा मिळाली. आज त्यांच्या जाण्याने आपण एक सहकार महर्षीच गमावलेले नाही, तर एक द्रष्टे समाजकारणी, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरवले आहे. त्यांची पोकळी कधीही भरून निघणारी नाही. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मनःपूर्वक सहभागी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढ्यांना नवी प्रेरणा मिळत राहो, हीच प्रार्थना.
एक अनुभवी राजकारणी,सहकार क्षेत्रातील तपस्वी नेतृत्व हरपले:- हंसराज अहिर
चंद्रपूर जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील अग्रणी सहकार महर्षी ऍड. बाबासाहेब वासाडे यांचे दुःखद निधनामुळे जिल्ह्यातील सहकार चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे. ऍड.बाबासाहेब अभ्यासू व कायद्याचे सखोल ध्यान असणारे व्यक्तिमत्व होते. सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य अनन्यसाधारण असेच होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावरील प्रदीर्घ कार्यकाळ व त्यांनी सहकार क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य सदैव स्मरणात राहतील. बाबासाहेब वासाडे यांनी सहकार क्षेत्रात अनेक नेते घडविले आहेत. महिला बचत गट संकल्पनेचे ते अध्वर्यू होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी राजकारणी,सहकार क्षेत्रातील तपस्वी नेतृत्व हरपले आहे.त्यांच्या निधनामुळे शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होतानाच दिवंगत आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो ही प्रार्थना..! सहकार महर्षी बाबासाहेब वासाडे यांच्या निधनाने सहकार चळवळीची मोठी हानी झाली आहे.
सहकार व शिक्षण चळवळीचे आधारस्तंभ हरपले:- आ. किशोर जोरगेवार
सहकार आणि शिक्षण क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेले, सहकार व शिक्षण महर्षी बाबासाहेब वासाडे यांचे दुःखद निधन हे संपूर्ण समाजासाठी एक अपूरणीय नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने सहकार व शिक्षण चळवळीचे आधारस्तंभ हरपले असल्याची प्रतिक्रिया आपल्या शोकसंदेशातून आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
बाबासाहेब वासाडे यांनी आपल्या कार्यातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सहकार क्षेत्राशी निगडित घटकांना नवी दिशा दिली. सहकार चळवळीचे महत्त्व आणि त्यातून होणारी सामाजिक-आर्थिक उन्नती याची जाणीव त्यांनी प्रत्येक गावागावांत पोहोचवली. त्यांच्या अथक प्रयत्नांतून जिल्ह्यात सहकाराची मजबूत पायाभरणी झाली.
कॉलेज जीवनापासूनच ते राजकारणात सक्रिय झाले. या दरम्यान ते युवक काँग्रेसचे अध्यक्षही झाले. ते शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय होते. शाळा, महाविद्यालये, अभियांत्रिकी कॉलेज उभे करून त्यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक बदल घडवून आणले. ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. ही वार्ता मनाला चटका लावून गेली. त्यांचे कार्य केवळ सहकार क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, तर शिक्षण, सामाजिक ऐक्य आणि समाजजागृती यामध्येही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी अर्पण केले आणि असंख्य तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले.
आज त्यांच्या जाण्याने केवळ एक सहकार महर्षी हरपलेले नाहीत, तर संपूर्ण समाजाने एक मार्गदर्शक, एक दूरदर्शी नेता आणि एक समाजकारणी गमावला आहे. त्यांची पोकळी भरून निघणारी नाही.या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या अपार कार्यातून समाजाला नेहमी नवी प्रेरणा मिळत राहो, अशी प्रार्थना आपल्या शोकसंदेशातून आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.