सावली:- मतिमंद मुलीवर गावाबाहेरील शाळेतील शौचालयात नेऊन सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना २१ सप्टेंबर रोजी सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पाथरी पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह दोघांना अटक केली आहे.
तुलाराम तानाजी मडावी (२२), विक्की विनोद कोवे (२१) या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.
सावली तालुक्यातील पाथरी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गावातील मतिमंद मुलीस चार जणांनी आमिष दाखविले. त्यामुळे गावाबाहेर आली. गावाबाहेर असलेल्या शाळेच्या परिसरात चौघेही तिला घेऊन गेले. तेथील शौचालयात तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर तिला गावात नेऊन सोडून दिले. ही बाब घटनेच्या चार दिवसानंतर म्हणजेच रविवार (ता. २१) सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आली.
तिने लगेच पाथरी पोलिस स्टेशन गाठले. आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. पुढील तपास पाथरी ठाणेदार नीतेश डोर्लीकर करत आहेत.