४४ लाखांचा मुद्देमाल जप्त; 46 दूचाकी व 05 चारचाकी वाहनांचा समावेश
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील काही दुर्गम व ग्रामीण भागात कोंबडा बाजार भरविण्याचा प्रयत्न जूगार खेळणायांकडून केला जात असतो. असे अवैध कोंबडा बाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजीवर पैंज लाऊन जुगार खेळणायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहे. यावरुन काल दिनांक 21/09/2025 रोजी उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणाया पोस्टे रेगडी हद्दीतील मौजा गरंजी टोला येथे अवैधपणे कोंबड्यांचा बाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजींवर जुगार खेळणाया 92 आरोपींवर गडचिरोली पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे. सदर कारवाईत एकूण 44,26,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त देखील करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, काल दिनांक 21/09/2025 रोजी उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणाया पोस्टे रेगडी हद्दीतील मौजा गरंजी टोला जंगल परिसरात सहाय्यक पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकातील तीन पथके माओवादी विरोधी अभियान राबवित असताना मौजा गरंजी टोला जंगल परिसरात काही इसमांचा मोठमोठ्याने आरडाओरड करण्याचा आवाज आल्याने पोलीस पथकातील अधिकारी व जवानांनी जवळ जाऊन सदर बाबत खात्री केली असता, त्या ठिकाणी काही इसम कोंबड्यांची झुंज लाऊन, त्यावर जुगार खेळत असल्याचे दिसून आले.
याबद्दल मा. वरिष्ठांना माहिती दिली असता मा. वरिष्ठांच्या परवानगीने पोस्टे रेगडी येथील पोलीस पथकाची योग्य त्या साहित्यानिशी दोन शासकिय पंचांसह कायदेशिर मदत घेऊन विशेष अभियान पथकातील अधिकारी व अंमलदार आणि पोस्टे रेगडी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे धाड टाकली असता, धाडी दरम्यान पोलीस आल्याची चाहूल लागताच जुगार खेळणायांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला होता. मात्र सदर कारवाई दरम्यान पोलीसांनी घटनास्थळावरुन एकूण 92 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील 1) एकूण 46 नग जुन्या वापरत्या मोटारसायकल अंदाजे एकूण किंमत 16,10,000/- रु. 2) एकूण 05 नग जुने वापरते चारचाकी वाहन एकूण किंमत 26,00,000/- रु. 3) एकूण 31 जुने वापरते मोबाईल फोन अंदाजे एकूण किंमत 1,70,000/- रु. 4) एकूण 14 नग कोंबडे अंदाजे एकूण किंमत 3,200/- रु. 5) 05 नग लोखंडी काती अंदाजे एकूण किंमत 250 रु. व 6) एकूण 42,950/- रु. रोख रक्कम अशा वर्णनाचा एकूण 44,26,400/- रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. यावरुन संबंधीत घटनेच्या अनुषंगाने नमूद 92 आरोपींवर पोस्टे रेगडी येथे अप क्र. 26/2025 कलम 12 (ब) महा. जुगार अधिनियम सहकलम 11 (फ) (न) प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे रेगडीचे पोउपनि. कुणाल इंगळे हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. अनिकेत हिरडे व विशेष अभियान पथकाचे सपोनि. विश्वास बागल, पोउपनि. ज्ञानेश्वर धुमाळ, पोउपनि. देवाजी कोवासे व अंमलदार यांनी पार पाडली.