Rajura News: जनसुरक्षा विधेयकावर राजुऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक

Bhairav Diwase

राजुरा:- राज्य शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे. हे विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नाही. त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” तत्काळ रद्द करण्यात यावे या मागणीला घेऊन संविधान चौक राजुरा येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कम्युनिस्ट पक्ष तथा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध तथा धरणे आंदोलन करण्यात आले.


यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर नागरी हक्क धोक्यात येणार आहेत. विशेषतः चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, मागास व संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पोलीस नियंत्रणाच्या नावाखाली सामान्य नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विरोधी मतधारक यांना अन्यायकारक कारवायांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे हा कायदा राबविण्याऐवजी तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन उरकुडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, सभापती विकास देवाळकर, ॲड. अरूण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, नर्सिंग मादर, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कम्युनिस्ट पक्ष तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.