गडचिरोली:- जंगलात गुरे चारावयास गेलेल्या शेतकऱ्यास रानटी हत्तीने सोंडेने उचलून ठार केले. ही घटना गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुराचुरा बिटातील जंगलात बुधवारी (दि.१०) संध्याकाळी घडली. वामन मारोती गेडाम (वय-६२, रा. चुरचुरा माल) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
वामन गेडाम हे बुधावरी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चुरचुरा-पिपरटोला जंगलात स्वमालकीची गुरे चारण्यासाठी गेले होते. सोबतच त्यांचा लहान भाऊ महादेव गेडाम व हिराजी खोब्रागडे हेदेखील होते. दिवसभर गुरे चारल्यानंतर संध्याकाळी गावाकडे परत येताना अचानक हत्तींचा कळप आला. त्यामुळे महादेव गेडाम व हिराजी खोब्रागडे हे पळत सुटले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, वामन गेडाम हे हत्तीच्या तावडीत सापडले. एका हत्तीने त्यांना सोंडेने उचलून खाली आदळले. यात ते जागीच ठार झाले. घटनेनंतर पोर्ला वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.