Suicide News: ओबीसींचे आरक्षणच संपले, सरकारने घात केला; ओबीसी तरुणाची नदीत उडी मारत आत्महत्या

Bhairav Diwase

लातूर:- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सरकारने मान्य केल्याने आणि हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरामध्ये आंदोलन, मोर्चे आणि उपोषण केले जात आहे. अशामध्येत ओबीसी समाजातील एका तरुणाने आत्महत्या केली. ओबीसीमधून आरक्षण आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने लातूरमध्ये ओबीसी समाजातील तरुणाने आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी खिशात चिठ्ठी लिहून मांजरा नदीत उडी मारली.


मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमध्ये ओबीसी समाजातील तरुणाने मांजरा नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लातूरच्या रेनापूर तालुक्यातील वांगदरी येथे ही घटना घडली. भरत महादेव कराड असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 'मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसी आरक्षण कायमस्वरूपी संपवलं आहे, सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसीविरुद्ध जीआर काढला.' अशा प्रकारची चिठ्ठी लिहीत या तरुणाने मांजरा नदी पात्रा उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलिस करत आहेत.


भरत कराड या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीमध्ये लिहिले की, मी भरत महादेव कराड आताच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसीचे कायमस्वरूपी आरक्षण संपवले आहे. मी वेळोवेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा.' या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.