Vijay wadettiwar: वडेट्टीवार म्हणाले, मराठा आरक्षणाच्या जी. आर. मुळेच लातुरच्या युवकाची आत्महत्या

Bhairav Diwase


नागपूर:- गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहे की सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही, पण हाच सरकारचा विश्वासघात आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. हे वृत्त धक्कादायक आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर मध्ये आधी पात्र हा शब्द होता आणि अवघ्या काही तासात दुसरा जीआर काढून त्यातून पात्र हा शब्द वगळण्यात आला, येथेच ओबीसी समाजाचा घात सरकारने केला.

सरकार आणि त्यांचे मंत्री वारंवार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भाषा करत असले तरी सत्य मात्र वेगळे आहे. आणि हे आता जनतेला कळले आहे यातूनच ओबीसींमध्ये निराशा येत आहे. अनेक ठिकाणी तर मंत्र्यांपासून संत्र्यानी ओबीसी प्रमाणपत्र मिळावल्याची चर्चा सुरू आहे. आता जर धनाढ्य मंत्र्यांनी पण ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली तर सामान्य ओबीसींच्या अधिकाराला हा धक्का नाही का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.


लातूर येथे ऐन उमेदीतील तरुण भरत कराड याची आत्महत्या ही सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. सरकारच्या शासन निर्णयामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे. यामुळे ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी वाढणार असून मराठवाड्यात तर एकतर्फी मराठा समाज ओबीसी आरक्षणात प्रवेश करण्याचा धोका आहे. लातूर येथील तरुणाची आत्महत्या हे तेच दर्शवत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. मराठवाड्यातील तरुणाने टोकाचे पाऊल उचल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का? ज्या शासन निर्णयाने ओबीसी समाजाचे नुकसान होईल त्या शासन निर्णयाला स्थगिती दिली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.


लातूर येथील भरत कराड याची ही आत्महत्या नाही तर सरकारने विश्वासघात केल्याने त्याचा जीव गेला आहे, त्यामुळे याची जबाबदारी महायुती सरकारला घ्यावी लागणार आहे. महायुती सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी , कंत्राटदार आणि आता ओबीसी समाजातील तरुण आत्महत्या करत आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याआधी सरकारने तातडीने यातून मार्ग काढावा आणि जीआर मागे घ्यावा. कराडचे बलिदान वाया जाणार नाही, जोपर्यंत जीआर रद्द होत नाही आणि घुसखोरी थांबत नाही त्यासाठी लढत राहू! तरुणांना आवाहन करत आहे आत्महत्या करू नये, असेही वडेट्टीवार म्हणाले.