Generator explosion : देवीच्या विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

Bhairav Diwase

वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या विसलोन गावामध्ये दुर्गा देवीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली. अचानक पाऊस सुरू झाल्याने मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला आणि मुलांनी डीजेचे साहित्य असलेल्या वाहनात आसरा घेतला. त्याचवेळी अचानक जनरेटरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे दोन लहान मुलांसह चार महिला आणि एक तरुण असे एकूण सात जण भाजले गेले.


जखमींमध्ये चार महिलांची नावे ताराबाई गोंडे (वय – ७९), गुणाबाई कुरेकर (वय – ५६), सुंदराबाई डाखरे (वय – ६३), आणि शोभा यशवंत बोबडे (वय – ६३) अशी आहेत. तसेच अंकुश मेश्राम (वय – ३२) हा तरुण, आणि यश बोबडे (वय – ४) आणि कुमारी डांगे (वय – ४) ही दोन लहान मुलं जखमी झाली आहेत.


या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी ताराबाई गोंडे आणि शोभा बोबडे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवर वरोरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलीस निरीक्षक अमित पांडे पुढील तपास करत आहेत.