Team India Win: टीम इंडियाची वर्ल्डकप फायनलमध्ये धडक! भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय

Bhairav Diwase


जेमिमा रॉड्रीग्ज व हरमनप्रीत कौरच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह टीम इंडिया महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाने सेमीफायनल सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ३३८ धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाकडून फिबी लिचीफिल्डने शतक झळकावत ९३ चेंडूत १७ चौकार व ३ षटकारांसह ११९ धावांची खेळी केली आणि संघांच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. तर एलिस पेरीने ७७ धावांची, बेथ मुनीने २४ धावांची खेळी केली. तर एश्ले गार्डनरने ६३ धावांची उत्कृष्ट खेळी केली. पण अखेरच्या षटकांमध्ये भारताने झटपट विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलिया अधिक धावा करू शकला नाही. भारताकडून श्री चरणी, दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर क्रांती, अमनज्योत व राधा यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात ३३९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. शफाली वर्मा १० धावा तर स्मृती मानधना २४ धावा करत बाद झाली. तर जेमिमा रॉड्रीग्ज व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी १६७ धावांची भागीदारी रचत भारतासाठी या सामन्यात मोठी भूमिका बजावली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ८८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ८९ धावांची खेळी केली. तर दीप्ती शर्मा २४ धावा करत माघारी परतली.जेमिमा रॉड्रीग्जने १३४ चेंडूत १४ चौकारांसह १२७ धावांची खेळी केली.