Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड आघाडी; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस

Bhairav Diwase
बिहार:- बिहार निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार प्रत्यक्ष निकालातही एनडीएला प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलापासून भाजपा आणि जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएला बहुमत मिळत आहे. त्यासोबतच कलांमध्ये तेजस्वी यादव यांची आरजेडी तिसऱ्या नंबरवर फेकल्याचे दिसून येते. मतमोजणीच्या निकालात जेडीयू आणि भाजपा यांच्यात मोठा भाऊ कोण यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

बिहारच्या एकूण २४३ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यात बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे. त्यात १०.३० च्या सुमारास जेडीयू ८० आणि भाजपा ७८ जागांवर आघाडीवर आहे. तर आरजेडी ४० जागा, काँग्रेस ७ जागांवर आघाडीचे असल्याचे दिसून येते. एनडीएमध्ये चिराग पासवान यांच्या एलजेपीला २२ जागांची आघाडी मिळाल्याचे दिसते. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजपाने एनडीए म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र मुख्यमंत्रि‍पदावरून निवडणुकीच्या प्रचारात सावध भूमिका घेत होते. आता निकालांमध्ये जेडीयू आणि भाजपा यांच्यातच काटे की टक्कर पाहायला मिळते. त्यामुळे एनडीएत बिहारमध्ये मोठा भाऊ कोण याची स्पर्धा जेडीयू आणि भाजपात सुरू झाली आहे.

बिहारमध्ये सध्या एनडीएने १८५ हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एनडीए सत्तेत येणार हे स्पष्ट झाले आहे. तर आरजेडी काँग्रेस आघाडीला ५०-६० जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्येही एनडीए पुन्हा सत्तेत येईल असे अंदाज वर्तवले होते. त्यात प्रामुख्याने महिला आणि ओबीसी वर्गातून एनडीएला मोठी साथ मिळाल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी बिहारमध्ये एनडीएचा मोठा विजय होईल अशी भविष्यवाणी केली आहे. बिहारमधील निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. त्यात एनडीएला विजयी आघाडी मिळाल्याने भाजपा आणि जेडीयू यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपा, जेडीयू यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटप करत फटाकेही फोडले जात आहेत.

दरम्यान, गेल्या निवडणुकीत 'किंगमेकर' असलेले नितीश कुमार आता थेट बिहारचे 'किंग' होणार असल्याचे चित्र आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये नितीश कुमारांच्या JDUने ८० जागांवर आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत नितीश यांच्या पक्षाला केवळ ४३ जागा होत्या. त्यामुळे ते किंगमेकरच्या भूमिकेत होते. पण यावेळी त्यांनी जोरदार मुसंडी मारून आपणच बिहारच्या राजकारणाचे 'किंग' असल्याचे दाखवून दिले आहे.