चंद्रपूर:- पोलिस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांची प्रतीक्षा २१५ पोलिस शिपाई पदाची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने संपली आहे. त्यामुळे क्रीडांगणावर पोलिस भरतीसाठी घाम गाळताना तरुण दिसत आहेत.
पोलीस व अन्य भरती बातम्या 2
महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमध्ये एकूण १५ हजार ६३१ पदांसाठी भरती प्रक्रियेला वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांसाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील उमेदवार पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. अनेकांनी शारीरिक आणि लेखी परीक्षेची काटेकोर तयारीही करत होते.
जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात
जिल्हा पोलिस दलात एकूण २१५ पदांसाठी भरती होणार आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच महिला उमेदवारांसाठी राखीव जागांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या देखरेखीखाली ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
शारीरिक आणि मैदानी चाचणीचा जोरदार सराव
पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी आपला सराव सुरू केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो युवक-युवती पहाटेपासूनच शारीरिक आणि मैदानी चाचणीचा जोरदार सराव करताना दिसत आहेत. एकंदरीत, चंद्रपुरातील जिल्हा स्टेडियम असो वा रामबाग मैदान... सर्वत्र तरुणाईच्या उत्साहाचे आणि तयारीचे वातावरण आहे. Chandrapur News
कसा करायचा अर्ज ?
भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे. policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी अपलोड करावी लागणार आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन ठेवणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, सध्या अर्ज करण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर तरुणांची गर्दी उसळत असल्याचे दिसून येत आहे.
निकष आणि पात्रता काय?
उमेदवार किमान इयता बारावी उत्तीर्ण असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी १,६०० मीटर धावणे, महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, गोळा फेक, पात्र उमेदवारांना वैद्यकीय तपासणी व कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल.
५० गुणांची फिजिकल, १०० गुणांची लेखी परीक्षा
पोलिस भरतीसाठी ५० गुणांची फिजिकल, १०० गुणांची लेखी परीक्षा असे परीक्षेचे स्वरूप आहे. उमेदवारांना दोन टप्प्यांत चाचणी द्यावी लागेल. शारीरिक चाचणी ५० गुण, लेखी परीक्षा १०० गुणांची राहणार आहे. गुणवत्ता यादीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
प्रवर्गनिहाय भरली जाणारी पदे
प्रवर्ग जागा
अनुसूचित जाती २५
अनुसूचित जमाती ३३
वि.ज.अ. ७
भ.ज.ब. ८
भ.ज.क. १३
भ.ज.ड. ६
वि.मा.प्र. ९
इ.मा.व. ५४
एसईबीसी १७
ईडब्ल्यूएस १७
आराखीव २६
वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना एक विशेष संधी
वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना सूट दिली जाणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे. मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना ५ वर्षांची सवलत, माजी सैनिकांना अतिरिक्त सवलती लागू राहणार आहेत. अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत वयोमर्यादा पूर्ण असणे आवश्यक आहे.
"पोलिस भरती पारदर्शक पद्धतीने सीसीटीव्ही आणि व्हिडीओ कॅमेऱ्याच्या निगराणीत घेण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांनी कठोर परीश्रम आणि परीक्षेची पूर्ण तयारी करावी. कोणत्याही भूलथापांना आणि आमिषाला बळी पडू नये, कुणी नोकरी लावून देण्याचे आमिष देत असेल, तर तक्रार करावी."- मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर.


