Chandrapur News: जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आठवडी बाजार बंद

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांसाठी तसेच भिसी नगरपंचायतीसाठी दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर दि. 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून मतमोजणी पार पडणार आहे. 4 नोव्हेंबर 2025 पासून या निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे.

मतदान व मतमोजणीच्या दिवशी संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात भरत असलेल्या आठवडी बाजारांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन, कायदा-सुव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी यांनी नमूद केले आहे.

मार्केट अ‍ॅण्ड फेअर अ‍ॅक्ट, 1862 चे कलम 5(अ) अन्वये जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मतदान दिवशी (दि. 2 डिसेंबर 2025 – मंगळवार) गडचांदूर येथे आठवडी बाजार येत असल्याने सदर आठवडी बंद ठेवण्यात येणार असून मतमोजणी दिवशी (दि. 3 डिसेंबर 2025 – बुधवार) भद्रावती व मूल येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

हा आदेश दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या स्वाक्षरीसह जारी करण्यात आला असून, सर्व संबंधितांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.