Short circuit: शॉर्टसर्किटने धानाचे पुंजणे जळाले; गंभीर भाजल्याने शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज

Bhairav Diwase

चिमूर:- चिमूर तालुक्यातील मौजा मेटेपार येथे जिवंत विद्युतप्रवाहाच्या शॉर्टसर्किटमुळे घडलेल्या भीषण दुर्घटनेत शेतकरी रामदास नन्नावरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या दोन एकर शेतातील धानाचे पुंजणे पूर्णतः जळून खाक झाले आहे. घटनेनंतर नन्नावरे यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले असून ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.


२२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नन्नावरे यांच्या शेताजवळील विद्युत लाइनमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. या शॉर्टसर्किटमुळे जिवंत विद्युतप्रवाह धानाच्या पुंजण्यात उतरला आणि त्याला आग लागली. धान जळत असल्याची माहिती मिळताच रामदास नन्नावरे हे आग विझविण्यासाठी शेतात गेले. मात्र, धान विझविण्याच्या प्रयत्नात त्यांना देखील जिवंत विद्युतप्रवाहाचा झटका बसला. त्यामुळे ते गंभीररीत्या भाजले आणि बेशुद्ध पडले. सदर शेतकऱ्याचे जळून खाक झालेल्या २ एकर धानामुळे सुमारे १ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.


स्वतः शेतकरी नन्नावरे गंभीर रित्या जखमी झाल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ते मृत्यूशी झुंज देत आहे. जळालेल्या पिकाचे मुळे कुटुंब आर्थीक संकटात सापडले असून मृत्यूशी झुंज देत असलेल्या शेतकऱ्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून विज वितरण कंपनीविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी विद्युत लाइनमध्ये शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते, तेथील तांत्रिक तपासणी कंपनीने वेळेवर करणे आवश्यक असते, परंतु हे नियम पाळले जात नसल्याची टीका नागरिकांनी केली.


धानाचे मोठाले पुंजणे जळत असल्याचे दृश्य पाहून गावकऱ्यांनी धाव घेतली. मात्र, विद्युतप्रवाह सुरू असल्याने कोणीही जवळ जाऊ शकत नव्हते. काही वेळात संपूर्ण धान खाक झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेनंतर धानाच्या पुंजण्याच्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, शेतकरी रामदास नन्नावरे यांच्या उपचारासाठी शासन आणि संबंधित विभागाने आर्थिक मदत जाहीर करावी, परिसरातील विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी करून सुरक्षितता वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.