चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दिलीप दादाजी मडावी (५३) असे अटकेतील शिक्षकाचे नाव आहे.
पीडित मुलगी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत मागील पाच वर्षांपूर्वी इयत्ता सहावीत शिकत होती. शिक्षकसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवण्याचा सल्ला मडावीने तिच्या आई-वडिलांना दिला. त्यामुळे मागील वर्षी ती मुलगी चंद्रपूर येथे शिक्षणासाठी आली. दरम्यान, त्या मुलीचे आई-वडील काही आवश्यक साहित्य त्या शिक्षकाकडे पाठवायचे. तेव्हा शिक्षक तिच्या रुमखाली जाऊन त्या मुलीला घरगुती सामान देण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवून तिचे शोषण करायचा. मात्र, बदनामीच्या भीतीने त्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.
२० तारखेला ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय तृप्ती खंडाईत यांनी पीडित मुलीचे बयान घेत शिक्षक दिलीप मडावी याच्यावर बीएनएस (७५ (१), ६४ (२), आयएमएफ ६५ १, ३५२, ४, ६, १२ पॉक्सो ६६ (ई) ६७ (ए) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
पीडित मुलीवर प्रत्यक्ष अत्याचार करूनही आरोपी तिच्यावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दबाव टाकत होता. तो तिला रात्रीच्या सुमारास बाथरुममध्ये जाऊन कपडे काढून व्हिडिओ कॉल करण्याची सक्ती करत असे. एवढेच नव्हे तर त्या कॉलचे स्क्रीनशॉट तो सेव्ह करून ठेवत असे. २० नोव्हेंबर २०२५ रोजी चुकून हे स्क्रीनशॉट व चॅटिंगचे काही भाग थेट मुलीच्या वडिलांच्या फोनवर गेले. हे पाहताच ते हादरून गेले. त्यांनी मुलीची विचारपूस केली असता तिने सर्व भयावह सत्य उघड केले. त्यानंतर तत्काळ पोलिस तक्रार नोंदवण्यात आली.


