चंद्रपूर: आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच, शहरात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने २३ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले आहे. ही आचारसंहिता लागू होताच, चंद्रपूर महानगरपालिका (मनपा) प्रशासन अतिशय तत्परतेने कामाला लागले आहे.
मनपाच्या अतिक्रमण प्रतिबंध विभागाने आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. पथकाने शहरातील विविध मुख्य चौक आणि मार्गांवर असलेले राजकीय नेत्यांचे, लोकप्रतिनिधींचे तसेच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या संभाव्य उमेदवारांचे फलक, बॅनर्स आणि पोस्टर्स तातडीने हटवण्याची मोहीम हाती घेतली. त्यासोबतच भविष्यात परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही फलक न छापण्याच्या आणि न लावण्याच्या सूचना ग्राफिक्सधारकांना देण्यात येणार आहे.

