चंद्रपूर:- माणूसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाच्या खाईत अडकलेल्या एका शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागल्याचा अत्यंत क्रूर आणि वेदनादायी प्रकार उघड झाला आहे.
ही हृदयद्रावक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात घडली आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे रोशन सदाशिव कुडे. बळीराजाच्या या वेदना पाहून दगडालाही पाझर फुटेल, पण दुर्दैवाने, सरकार आणि प्रशासनाला त्यांचं हे आभाळाएवढं दुःख कधी दिसलंच नाही.
रोशन कुडे यांच्याकडे केवळ चार एकर शेती आहे. याच शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत उत्पन्न होईना. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून 50-50 हजार रुपये कर्ज घेतले. पण दुर्दैवाने, खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या आणि शेतीही पिकेना.
येथूनच रोशन कुडे यांच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली. सावकारी कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी त्यांची दोन एकर जागा विकली, ट्रॅक्टर विकला, घरातील सामान विकलं, पण कर्ज काही संपेना.
तुम्हाला धक्का बसेल, पण रोशन कुडे यांनी घेतलेलं केवळ एक लाख रुपयांचं कर्ज, सावकारांच्या भरमसाठ व्याजामुळे आज तब्बल ७४ लाखांवर पोहोचलं आहे! एका लाखावर दिवसाला १० हजार रुपये व्याज लावलं जात असल्याचं उघड झालं आहे!
या अवाजवी आणि क्रूर वसुलीला कंटाळून, कर्जातून मुक्त होण्यासाठी या बळीराजाने आपल्या शरीराचा भाग विकण्याचा अत्यंत वेदनादायी निर्णय घेतला. रोशन कुडे यांनी आपली किडनी विकली!
महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सावकारी पाशाची क्रूरता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. कर्जबाजारीपणामुळे आपले लाखो शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर असताना, ही घटना व्यवस्थेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर मोठा प्रश्नचिन्ह उभी करते.

