चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चंदा वनविभाग अंतर्गत गोंडीपिंपरी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून दहशत माजवणारा टी-115 वाघ अखेर वनविभागाच्या ताब्यात आला आहे. आठ दिवसांत 20 ते 25 जनावरांचा फडशा पाडून दोन शेतकऱ्यांचे प्राण घेणाऱ्या या नरभक्षक वाघाला तब्बल 60 दिवसांच्या शोधमोहीमेनंतर काल गुरुवारी सायंकाळी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
गोंडीपिंपरी तालुक्यातील चेकपिपरी आणि गणेश पिंपरी परिसरात ऑक्टोबर महिन्यापासून टी-115 वाघाने प्रचंड दहशत निर्माण केली होती. या वाघाने अल्प कालावधीत 20 ते 25 जनावरांवर हल्ले करून त्यांचा फडशा पाडला. एवढ्यावरच न थांबता अवघ्या आठवडाभराच्या कालावधीत दोन शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करून त्यांचा बळी घेतला होता. या घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीकाम, गुरे चराई तसेच जंगलालगत जाणे ग्रामस्थांनी टाळले होते. परिस्थिती गंभीर बनल्यानंतर वनविभागाने विशेष शोध मोहीम राबवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.
अखेर पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील केमारा गावाजवळ गुरुवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने वाघावर बेशुद्धीचे इंजेक्शन मारा करून त्याला यशस्वीपणे जेरबंद केले. हा वाघ सुमारे साडेतीन वर्षांचा नर असून त्याचे वजन सुमारे अडीच क्विंटल असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. जेरबंद करण्यात आलेल्या टी-115 वाघाला पुढील उपचार व निरीक्षणासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

