Pombhurna News: रेतीघाट खंडणी प्रकारणात काँग्रेसचे वैभव पिंपळशेंडे रामनगर पोलिसांच्या ताब्यात

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- तालुक्यातील चेक वेऴवा–अंधारी नदी घाटावरील रेती उपसा व वाहतूकीच्या कामात अडथळे निर्माण करून खंडणी मागितल्याच्या गंभीर आरोपावरून काँग्रेसचे स्थानिक नेते वैभव कुशाबराव पिंपळशेंडे (वय ३०, रा.चेक ठाणेवासना) ता.पोंभुर्णा याचेवर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 308(5) आणि 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून चंद्रपूर रामनगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.


रेती घाट कंत्राटदार शिवकुमार शंकर कोरेवार (वय ४०, रा. रामनगर) यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीत म्हटले आहे की त्यांनी पोंभुर्णा तालुक्यातील चेक वेळवा रेतीघाटाचा दोन वर्षांचा ठेका घेतला होता. या कामात आरोपी वैभव पिपंळशेंडे यांनी मुद्दाम अडथळे निर्माण करीत काम करू देणार नाही.घाट बंद पाडतो जिवंत सोडणार नाही अशा धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.


फिर्यादीच्या मते, पिंपळशेंडे यांनी ऑनलाइन पद्धतीने विविध तारखांना एकूण १ लक्ष ४३ हजार रुपये इतकी रक्कम घेतली असून याशिवाय रेतीघाटावर असलेल्या सुपरवायझरकडून १ लक्ष रुपये रोख स्वरूपात उकळल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा प्रकारे वैभव पिंपळशेंडे यांनी एकूण २ लक्ष त्रेचाळीस हजार रुपयाची खंडणी घेतल्याची माहिती फिर्यादीने रामनगर पोलिसांना आपल्या तक्रारीत दिली आहे.


तक्रार मिळताच चंद्रपूर रामनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणातील पुढील तपास चंद्रपूर रामनगर पोलिसांकडून सुरू असून संपूर्ण व्यवहाराची शहानिशा करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे पोंभूर्णा तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे.