बंगाली कॅम्प प्रभाग चारमध्ये मतदारांचे लागले लक्ष
चंद्रपूर:- महापालिकेच्या रणधुमाळीत सध्या एका खास प्रभागाची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे. प्रभाग क्रमांक ४ म्हणजेच बंगाली कॅम्प परिसर! येथे निवडणुकीचे मैदान एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे तापलंय.
यावेळेस मैदानात आहेत दोन सख्खे जुळे भाऊ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) एकाच प्रभागातून सचिन बाबूराव भोयर आणि नितीन बाबूराव भोयर हे दोन जुळे भाऊ नशीब आजमावत आहेत.
विशेष म्हणजे, हे दोन्ही भाऊ एकाच प्रभागातील वेगवेगळ्या गटातून निवडणूक लढवत आहेत. सचिन बाबूराव भोयर हे 'ब' गटातून रिंगणात आहेत, तर नितीन बाबूराव भोयर हे 'ड' गटातून आपले नशीब आजमावत आहेत.
सचिन भोयर हे काही नवीन नाव नाही. ते माजी नगरसेवक आहेत आणि त्यांनी यापूर्वी राजुरा विधानसभा निवडणूकही लढवली आहे. त्यांचा दांडगा अनुभव आणि आता त्यांच्यासोबत त्यांचे जुळे भाऊ नितीन भोयर मैदानात उतरल्याने, या प्रभागात मनसेची ताकद दुप्पट झाल्याची चर्चा आहे.
एकाच कुटुंबातील दोन चेहरे आणि तेही जुळे भाऊ! यामुळे मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता बंगाली कॅम्पमधील जनता या दोन्ही भावांच्या पारड्यात आपले मत टाकते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

