कडक सुरक्षा आणि सीसीटीव्हीचा पहारा; चंद्रपूर पोलीस भरतीचा थरार सुरू
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात सहभागी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी! ११ फेब्रुवारी २०२६ पासून चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पोलीस भरती २०२४-२५ ची प्रक्रिया अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू झाली आहे. २१५ रिक्त पदांसाठी ही भरती होत असून, यात पारदर्शकता राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा आधार घेतला जात आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी एकूण २०,६८३ आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये १४,६०७ पुरुष, ६,०७४ महिला आणि २ तृतीय पंथी उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी अत्याधुनिक RFID (Radio Frequency Identification) चिप्सचा वापर धावण्याच्या चाचणीसाठी केला जात आहे. तसेच उमेदवारांची उंची अचूक मोजण्यासाठी लेझर (Laser) तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.
भरती प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी १ पोलीस अधीक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक, १८ पोलीस निरीक्षक आणि ३९१ अंमलदारांसह एकूण ६८ अधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी तैनात आहेत. संपूर्ण मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हिडिओग्राफर्सची करडी नजर आहे. भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून 'त्यांचा कोणताही नातेवाईक या भरतीत उमेदवार नाही' असे हमीपत्रही लिहून घेण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने उमेदवारांना सतर्क केले आहे की, त्यांनी कोणत्याही आमिषाला किंवा भुलथापांना बळी पडू नये. ही भरती पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे. तसेच, शारीरिक चाचणी दरम्यान कोणत्याही मादक किंवा उत्तेजक पदार्थांचे सेवन करू नये; अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

