पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे तातडीने चौकशीचे आदेश
चंद्रपूर:- सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत १०० मीटर धावण्याच्या चाचणीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या RFID सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या आहेत. या तांत्रिक त्रुटीमुळे अनेक सक्षम उमेदवारांना अत्यंत कमी गुण मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती. या गंभीर बाबीची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला, त्यानंतर आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहे.
नेमकी तक्रार काय?
उमेदवारांच्या दाव्यानुसार, १०० मीटर धावण्याच्या चाचणीत वेळेची अचूक गणना होत नसून, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूरमधील उमेदवारांना १५ पैकी केवळ ४ ते ८ गुण मिळत आहेत. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
प्रशासनाची भूमिका आणि आश्वासन
या प्रकरणी मुनगंटीवार यांच्या स्वीय सहाय्यकांनी आणि विद्यार्थ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांची भेट घेतली. चौगुले यांनी तातडीने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला.
डाटा ॲनालिसिस: पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, RFID बाबत तांत्रिक तपासणी करण्यासाठी एका विशेष टीमने याकडे लक्ष दिले आहे.
मैदान बदलणार नाही: ११ फेब्रुवारीपासून ज्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे, तिथेच पुढील प्रक्रिया पार पडेल. नवीन मैदानावर १०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जाणार नाही.
पारदर्शकता: "कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरू आहे तसेच कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले.
विद्यार्थ्यांनी मानले आभार
पोलीस प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या त्वरित पाठपुराव्यामुळे उमेदवारांनी समाधान व्यक्त केले असून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांचे आभार मानले आहेत. पोलिसांनी देखील उमेदवारांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ स्वतःच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.

