Chandrapur police Bharati: मैदानी चाचणीत पूर्ण नवीन संधीची विनंती फेटाळली, केवळ १०० मीटरसाठी मिळणार पुन्हा चान्स

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्या उमेदवारांनी ११ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मैदानी चाचणी दिली होती, त्यांच्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे.


चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे की, या कालावधीत हजर आणि पात्र असलेल्या काही उमेदवारांनी संपूर्ण मैदानी चाचणी पुन्हा घेण्याची विनंती केली होती. मात्र, पोलीस भरती मंडळ निर्णय समितीने ही विनंती अमान्य केली आहे. तरीही, उमेदवारांच्या आक्षेपांची दखल घेत प्रशासनाने केवळ १०० मीटर धावणे ही चाचणी पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ही फेरचाचणी येत्या रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ५.०० वाजता पोलीस मुख्यालय कवायत मैदान, चंद्रपूर येथे पार पडणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
 येताना आवेदन अर्जाची प्रत आणि प्रवेशपत्राच्या (Admit Card) २ प्रती सोबत ठेवाव्या.

 स्वतःचे ४ लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो आणणे अनिवार्य आहे.

 ओळखपत्रासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्डची मूळ प्रत (रंगीत फोटोसह) सोबत असावी.