चंद्रपूर:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने आज एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आज, २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता महानगरपालिका पटांगणावर 'महिला सशक्तीकरण सन्मान सोहळा' पार पडणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहेत शिवसेनेच्या प्रखर वक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे. आपल्या सडेतोड आणि आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या अंधारे यांची तोफ आज चंद्रपुरात नेमकी कुणावर धडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केवळ भाषणच नाही, तर समाजाच्या विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव या कार्यक्रमात केला जाणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला शिवसैनिक, युवा सेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह चंद्रपूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

