प्रतिभा धानोरकरांना अंधारेंचा 'अप्रत्यक्ष' टोला
चंद्रपूर:- चंद्रपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगलंय! पण यावेळी निशाण्यावर विरोधक नाही, तर मित्रपक्षाच्याच खासदार आहेत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रपुरातील एका कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
"ज्यांनी चंद्रपूर महानगरपालिकेत आमची वाट अडवण्याचा प्रयत्न केला... ज्या नेत्यांनी आमची नाकेबंदी केली, अशांची नाकेबंदी आम्ही येणाऱ्या लोकसभेत करू. अजून दोन ते तीन वर्ष वेळ आहे. ज्यांनी आमची नाकेबंदी केली, त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्कीच जाईल!" असे वक्तव्य अंधारे यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेतील सत्तेच्या समीकरणावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता. महापालिकेत शिवसेनेची कोंडी करणाऱ्यांना लोकसभेच्या निवडणुकीत धडा शिकवू, असा इशाराच अंधारे यांनी दिलाय.
या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. आता या टीकेला खासदार प्रतिभा धानोरकर कशा प्रकारे उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

