Chandrapur News: "मुंबई महापालिकेत नाकेबंदी का केली नाही?" – सुषमा अंधारेंवर थेट पलटवार

सुषमा अंधारेंच्या 'नाकेबंदी'ला खासदारांचे सडेतोड उत्तर
चंद्रपूर:- चंद्रपूरच्या राजकीय रणांगणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी काल चंद्रपुरात केलेल्या 'लोकसभा नाकेबंदी'च्या विधानाला आता जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. "जनता माझ्या सोबत आहे आणि ही नाकेबंदी पुन्हा एकदा भेदली जाईल," असा ठाम विश्वास स्थानिक खासदारांनी व्यक्त केला आहे.

सुषमा अंधारे यांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत विरोधकांची नाकेबंदी करण्याचा इशारा दिला होता. मात्र, या इशाऱ्याला उत्तर देताना खासदारांनी अंधारेंच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रसिद्धीसाठी अशी विधाने केली जात असल्याची टीका करत त्यांनी मुंबई महानगरपालिकेचा दाखला दिला. "जर नाकेबंदीच करायची होती, तर मुंबई महापालिकेत का केली नाही?" असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.


यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या विधानांचा संदर्भ देत, घटक पक्षांशी गद्दारी करणाऱ्यांवर आणि भाजपशी हातमिळवणी करणाऱ्यांवर निशाणा साधला. "ज्यांनी शेण खाल्लं, त्यांना जर तुमचा पाठिंबा असेल, तर अशा नेत्यांचे आम्ही स्वागतच करतो," असा टोलाही त्यांनी लगावला.


यापूर्वीही चंद्रपुरात माझ्या विरोधात अनेकदा नाकेबंदी करण्याचे प्रयत्न झाले. पण जनतेने नेहमीच ती नाकेबंदी मोडीत काढून मला लोकसभेत पाठवले आहे. माझा माझ्या मतदारांवर आणि जनतेवर पूर्ण विश्वास आहे. यावेळीही जनता या नाकेबंदीला भीक न घालता मला पुन्हा विजयी करेल. आणि खरोखरच—निवडणुका म्हणजे नेमके काय असते आणि निवडणुका कशा लढल्या जातात—याविषयीची सविस्तर समज सुषमा ताईंनीही याच ठिकाणी करून घेतली पाहिजे.