Chandrapur News: एसीबीच्या धाडीनंतर अधिकारी आणि एजंट पसार; लक्कडकोट चेकपोस्टवर खळबळ

Bhairav Diwase
राजुरा:- तालुक्यातील लक्कडकोट येथील आरटीओ चेकपोस्टवर ट्रक चालकांकडून 'एन्ट्री'च्या नावावर मोटार वाहन निरीक्षकाच्या खासगी एंजटने ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा प्रकार २३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पंचासमोर उघड झाला. या कारवाईत मोटार वाहन निरीक्षकाने लाचेसाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच अधिकारी व एजंट दोघेही घटनास्थळावरून पसार झाले आहेत.


विलास विठोबाजी देशमुख (खासगी एजंट, रा. नागपूर) व पवन प्रभाकरराव पोटदुखे (३६, मोटार वाहन निरीक्षक, आरटीओ कार्यालय, चंद्रपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार हे ट्रकचालक असून, ते तेलंगणातील असिफाबाद येथून मालवाहू ट्रक घेऊन नागपूरकडे जात होते. लक्कडकोट चेकपोस्टवरून ट्रक पार करण्यासाठी कागदपत्रांच्या तपासणीच्या नावावर आरटीओ अधिकारी आणि त्यांचे खासगी एजंट 'एन्ट्री' म्हणून पैशांची मागणी करत होते. ही छळवणूक थांबवण्यासाठी तक्रारदाराने २० मार्च रोजी नागपूरच्या एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली. २३ मार्च रोजी तक्रारदार ट्रक घेऊन लक्कडकोट येथे पोहोचले असता, खासगी एजंट विलास देशमुख याने मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्या सांगण्यावरून ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही रक्कम पंचसमक्ष स्वीकारताच 'एसीबी'च्या पथकाने झडप घातली. मात्र, कारवाई होत असल्याचे लक्षात येताच आरोपी देशमुख आणि निरीक्षक पोटदुखे यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही कारवाई एसीबी नागपूरचे पोलिस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वात, पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलिस हवादार विलीन तांबडे, सोमेश्वर वाईलकर, प्रफुल्ल भातुलकर, स्वाती हिंडोरिया यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर 'एसीबी'चे पोलिस निरीक्षक नीलेश उरकुडे करत आहेत.


दोन्ही आरोपी पसार झाले असले तरी, 'एसीबी'ने चेकपोस्टवरील कार्यालयीन खोलीची झडती घेतली. यावेळी संशयास्पदरीत्या जमा केलेली सात हजार १२० रुपयांची रोकड, सापळ्यातील ५०० रुपये आणि आरोपी एजंटचा मोबाइल जप्त केला आहे. सध्या आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, राजुरा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ (अ) आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.